नुकताच झालेल्या केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या बैठकीत निती आयोगाचे उपाध्यक्ष श्री राजीव कुमार यांनी झिरो बजेट आध्यात्मिक शेती पध्दती हीच भारतातील शेतकऱ्यांचे उत्पादन सन 2022 पर्यंत दुप्पट करण्यास उपयुक्त आहे, असे मत व्यक्त केले आहे. आपल्याला फक्त कृषी उपज मुल्य वाढवून चालणार नाही, तर शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा लागेल आणि झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेतीच यावर योग्य उपाय आहे, असे मत त्यांनी नुकताच दिल्ली येथे कृषीऋषी पद्मश्री श्री सुभाष पाळेकर यांचे सोबत पार पडलेल्या निती आयोगाच्या महत्वपुर्ण बैठकी नंतर व्यक्त केले. आता सरकारनेच झिरो बजेट नैसर्गिक अध्यात्मिक शेतीचे महत्व मान्य केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व ग्राहकांना विषमुक्त अन्नधान्य मिळेल. गेली सुमारे वीस वर्ष चाललेल्या झिरो बजेट नैसर्गिक अध्यात्मिक शेती चळवळीला आता शासनाचे बळ मिळणार असल्याने शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा होणार आहेच पण भारताच्या कृषिविकासाचा दर वाढून गोसंवर्धन सुद्धा होणार असल्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आनंद झाला आहे.
रासायनिक शेती व सेंद्रिय शेती हे परदेशी तंत्रज्ञान असून शेतकऱ्यांची संगठीतपणे लुट आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे, विषयुक्त अन्नामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणारे व जीव, जल, जंगल, जमीन व पर्यावरणाचा नाश करणारे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी झुगारून देऊन बाजारातून एकही निविष्ठा म्हणजेच खत, कीटकनाशके, आधुनिक बियाणे, सिंचन साधने न आणता त्या शेतातच तयार करणाऱ्या झिरो बजेट नैसर्गिक अध्यात्मिक शेतीचा आवलंब करणे ही काळाची गरज आहे.
मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘सुभाष पालेकर नैसर्गिक अध्यात्मिक शेती’. जंगलातील विविध प्रकारच्या वनस्पतींना कोणीही पाणी देत नाही, खत टाकत नाही, फवारणी करत नाही व कोणत्याही प्रकारची मशागत करत नाही तरी त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा वनस्पतींमध्ये अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले व आज शेतीची दुर्दशा झाली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे व नागरिक विविध आजारांनी त्रस्त झाला आहे. जंगलामध्ये असलेली नैसर्गिक व्यवस्था गावरान गायीच्या शेण व मूत्राचा वापर करून आपल्या शेतामध्ये तयार करून शेती करणे म्हणजेच ‘सुभाष पालेकर नैसर्गिक अध्यात्मिक शेती’.
सुभाष पालेकर नैसर्गिक शेतीची वैशिष्टे
• ही निसर्ग, विज्ञान व अध्यात्मावर आधारित अशी शाश्वत कृषी पध्दती आहे.
• या पध्दतीमध्ये आपल्याला शेणखत तसेच आधुनिक बियाणी, रासायनिक खते, कीटकनाशक, सेंद्रिय खते, गांडूळ-खत अश्या कोणत्याही निविष्टा विकत आणाव्या लागत नाही. तसेच या पध्दतीत १०% पाणी व १०% विजेची आवश्यकता असते; म्हणजेच ९०% पाणी व विजेची बचत होते.
• या शेतीत उत्पादन रासायनिक व सेंद्रिय शेती पेक्षा कमी मिळत नाही, उलट जास्त मिळते. उत्पादित शेतमाल हा पूर्णतः विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार व स्वादिष्ट असतो त्यामुळे जास्त मागणी व भावही चांगला मिळतो.
• नैसर्गिक शेतीत उत्पादन खर्च शून्य असल्याने एकही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत नाही. नैसर्गिक आपत्तीतही ही पिके तग धरतात.
• रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे मानव, पशु, पक्षी, पाणी, पर्यावरणाचा विनाश होत आहे. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या सर्वांचा विनाश टाळला जातो व नैसर्गिक संसाधनांची शाश्वतता वाढते.
शून्य उत्पादन खर्च, जास्त उत्पादन, उत्तम दर्जा, चांगली मागणी, योग्य भाव अश्या हया नैसर्गिक शेतीमुळे खेड्याकडून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर कमी होण्यास नक्की मदत होणार आहे. तसेच हवेतील अधिकाधिक कार्बन हे काष्ट आच्छादनात बंदिस्त करण्याची आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून हवेतील जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड बंदिस्त करण्याची किमया ‘झिरो बजेट’ शेती करत असल्याने ‘ग्लोबल वॉर्मिग’ रोखण्यास सुद्धा मदत होणार आहे.
सुभाष पालेकर नैसर्गिक शेतीची पद्धत
शेताची सुपीकता ही त्या मातीत असणाऱ्या जीवाणू व गांडूळे यांच्या संख्येवर अवलंबून असते. रासायनिक शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या खतांमुळे व कीटकनाशकांमुळे जीवाणू व गांडूळे यांची संख्या कमी झालेली असते. ही संख्या वाढविण्याकरिता जीवामृताचा वापर शेतामध्ये केला जातो. या जीवामृताकरिता गावरान गाईचे १० किलो शेण, १० लिटर मूत्र, १ किलो गूळ, १ किलो कडधान्याचे पीठ व जीवाणू माती या पाच घटकांचा वापर केला जातो. गावरान गाईच्या १ ग्रॅम शेणामध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ३०० कोटी जीवाणू असल्यामुळेच गावरान गाईचे शेण वापरले जाते. हे सर्व घटक चार ते पाच दिवस एका टाकीत सुमारे १८० लिटर पाण्यात टाकून कुजवले जातात (किण्वन क्रिया). या मिश्रणाला जीवामृत असे म्हणतात. हे २०० लिटर जीवामृत १ एकर जमिनीस पुरेसे असते. हे जीवामृत महिन्यातून कमीतकमी एकदा द्यावे लागते. मात्र यासाठी जमिनीवर काष्टाचे म्हणजेच गवत, पालापाचोळा इत्यादींचे आच्छादन असणे गरजेचे आहे. या जीवामृताच्या नियमित वापराने जमिनीत जीवाणू व गांडूळांची संख्या प्रचंड वाढून पिकांसाठी लागणारे अन्न म्हणजेच ह्युमसची निर्मिती होते व सर्व प्रकारची घटकद्रव्ये पिकांसाठी उपलब्ध होतात. एक देशी गाय दिवसाला सरासरी १० किलो शेण देते. एका गायीचे एका दिवसाचे शेण एका एकराला महिन्यातून एकदा द्यायचे आहे. म्हणजे ३० दिवसांचे शेण ३० एकराला पुरेसे आहे. म्हणजेच एका देशी गाईपासून ३० एकर शेती होऊ शकते.
नैसर्गिक शेतीसाठी कीटकनाशक म्हणून जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र आणि अग्नीअस्त्र अशी मिश्रणं वापरली जातात. बिज संस्काराकरिता बिजामृत तर पोषणासाठी बीजांकुर अर्क वापरला जातो.
रासायनिक व सेंद्रीय शेतीला कडाडून विरोध करणाऱ्या शेतीतज्ज्ञ कृषीऋषी सुभाष पाळेकर यांनी संशोधनाअंती नैसर्गिक शेतीचं मॉडेल उभं केलं आहे. शेतीतल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसंच महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांच्या मॉडेलनुसार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. झिरो बजेट नैसर्गिक अध्यात्मिक शेतीमुळे देशात दुसरी हरितक्रांती होऊ घातली आहे.