Scholership Exam | स्कॉलरशिप परीक्षांचे का वाढत आहे महत्त्व ?

आज कोणत्याही सरकारी नोकरीसाठी म्हणजे चपरासी, कारकुनापासून ते कोणत्याही राज्य सरकारी (एम पी एस सी) व केंद्र सरकारी (यु पी एस सी) अधिकार्यापर्यंत स्पर्धा परीक्षा ही अनिर्वार्य आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सारख्या पंचायतराज संस्था, कोर्ट, पोलीस व सर्व शासकीय तसेच निमशासकीय नोकऱ्या या स्पर्धा परीक्षानेच भरल्या जातात.

बँकेतील सर्व जागा, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, शिक्षक, रेल्वे, सैन्य इत्यादी सर्व भरतीसाठी स्पर्धा परीक्षा अनिर्वार्य आहेच. एवढेच नव्हे तर बहुतेक खाजगी कंपन्या सुद्धा चाळणीसाठी स्पर्धा परीक्षा घेतात. म्हणजेच नोकरी कोणतीही असो स्पर्धा परीक्षा ही आलीच. याच बरोबर बारावीनंतर जवजवळ सर्व शिक्षणशाखांतील प्रवेश्याकरिता स्पर्धा परीक्षा अनिर्वार्य केल्या आहेत. उदा. सी इ टी, नीट, जे ई ई, कॅट, सी एल ए टी इत्यादी.

वरील सर्व परिक्षान्चा अभ्यास केला तर असे दिसून येते की सर्वसाधारणपणे या परिक्षान्मध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हे विषय अनिर्वार्य असतात. चतुर्थ श्रेणी पासून प्रथम श्रेणी नोकर्यांसाठी काठीण्य पातळी वाढत जाते पण विषय मात्र हेच असतात. तसेच इतर विषयांमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, घटना, अर्थशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश होतो.

स्पर्धा परिक्षापासून आता कोणालाच पळ काढता येणार नाही. स्पर्धा परिक्षाना टाळणारे उच्च शिक्षण घेऊच शकत नाहीत व कोणतीही नोकरीसुद्धा मिळवू शकत नाहीत. उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच मिळू शकतात. म्हणून आता प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आवश्यक झाले आहे. कित्तेक विद्यार्थी हे बारावी व पदवी परिक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळवतात परंतु महाविद्यालय प्रवेश व नोकरीसाठी या गुणांचा उपयोग नसून स्पर्धात्मक प्रवेश परिक्षेतिल गुण हेच जास्त महत्वाचे असतात.

कोकणातील शालेय व पदवी परिक्षान्चे निकाल हे राज्यात अव्वल असले तरी सरकारी नोकऱ्यांमध्ये (चतुर्थ श्रेणी पासून ते प्रथम श्रेणी पर्यंत) कोकणातील विद्यार्थांचे प्रमाण हे नगण्य आहे. बारावीत चांगले मार्क्स मिळूनही सी. ई. टी व नीट मध्ये चांगले मार्क्स न मिळाल्याने कित्तेक हुशार मुलांना चांगल्या इंजिनीरिंग व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशापासून वंचित राहावे लागते किवा चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही. एल. एल. बी साठी कॉमन लॉ अडमीशन टेस्ट नावाची प्रवेश परीक्षा असते हे अजूनही कित्तेकाना माहीत नसते. सी. ए (चार्टर्ड अकौंटंट), सी. एस. (कंपनी सेक्रेटरी) साठी प्रवेश परिक्षेबद्धल शिक्षकसुद्धा अनभिज्ञ असतात. आय. आय. टी. इंजिनीरिंगमध्ये प्रवेशासाठी असलेली जे. ई. ई. व आय. आय. एम. (व्यवस्थापन) प्रवेशासाठी असलेली सी. ए. टी. यासाठी अभ्यास हा सुरवातीपासूनच करायचा असतो, त्या अभ्यासासाठी एक पध्दत असते व या साठी चांगला क्लास लावणे आवश्यक असते. एम. एस. डब्लु ( मास्टर इन सोशल वर्क), कोणतीही पी. एच. डी., विविध आर्ट कॉलेजेस (उदा. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट), सर्व सैनिकी कॉलेज (उदा. एन. डी. ए) आदींच्या प्रवेशासाठी कशी व केव्हा तयारी करावी ह्याचे मार्गदर्शन कोकणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने कोकणातील विद्यार्थी विविध शैक्षणिक विद्यालयात प्रवेश घेताना सध्या मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोकणामधील युवांची जी अवस्था उच्च शिक्षणाची त्यापेक्षा बिकट अवस्था सरकारी नोकऱ्यांची. यु.पी.एस.सी. परिक्षेत बसण्याचे धाडसच कोकणामधील युवा करीत नाहीत. गेल्या कित्तेक वर्षात यु.पी.एस.सी. मध्ये निवड झालेले अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पहावयास मिळतील. एम. पी. एस. सी. ची सुद्धा हीच अवस्था. या परिक्षेला युवा बसतात. परंतु अभ्यास कधीपासून करावा, कुठला म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, त्यासाठी कुठली पुस्तके वापरावी, मुलाखतीची तंत्रे याचे पद्धतशीर मार्गदर्शन कोकणामध्ये उपलब्ध नाही. विद्यार्थी कुठलीतरी चार पाच पुस्तके वाचून परिक्षेला सामोरे जातात परंतु यश मात्र दूरच असते. त्यामुळे कोकणातील मुलांचे महाराष्ट्रामध्ये प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांचे प्रमाण नसल्यासारखेच आहे.

तृतीय व चतुर्थ वर्ग म्हणजे महाराष्ट्र शासनातील सर्व सरकारी व निमसरकारी प्रवर्गातील क्लार्क, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस तसेच शिपाई या सर्व पदांसाठी लेखी स्पर्धा परीक्षा ठेवल्यामुळे गेल्या दहा वर्षात कोकणातील युवा या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भरतीस सुद्धा पारखा झाला आहे. स्पर्धा परिक्षेचे तंत्र वेळीच समजून न घेतल्यामुळे कोकणातील युवांवर ही वेळ आली आहे.

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँक ऑफिसर रिक्रुटमेंट- आय बी पी एस, बँक ऑफिसर रिक्रुटमेंट- एस बी आय, इन्शुरन्स रिक्रुटमेंट, स्टाफ सिलेक्शन बोर्ड इत्यादी अनेक संस्थांद्वारा हजारो नोकर भरती होत असते परंतु इथे कोकणातील तरुण अभावानेच आढळून येतो. काही युवा स्पर्धा परीक्षांची सर्व माहिती मिळवतातही. परंतु स्पर्धा परीक्षांची सर्व माहिती मिळवूनही यश मिळविता येईल असा अभ्यास सर्वजण करतातच असे नाही. काही युवांचा असा समज झालेला असतो की आता पदवी परीक्षेपर्यंत अभ्यास केलेला आहे तर आता परत अभ्यासाची गरज नाही. त्या दरम्यान ते कोणत्यातरी खासगी क्षेत्रात नोकरीला सुरुवात करतात व त्या ठिकाणी नोकरी करताकरता वेळ काढून स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात. थोडाफार अभ्यास करून अपयश पदरी पडल्याने हे युवा पुढे असे सांगताना आढळतात की, बऱ्याच परीक्षा दिल्या परंतु काही उपयोग नाही व यामुळे स्पर्धा परीक्षांबाबत गैरसमज पसरतात.

या परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्याची भूमिका फार महत्त्वाची असली तरी शिक्षक व पालकांची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे. मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांचे विचार, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे वागणे हे मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास घडवून आणण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यांनी शाळेतील गुणांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांना बसवून आपल्या मुलाची गुणवत्ता तपासावी. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या थोडय़ा-थोडय़ाशा विषयात त्यांना न अडकवता, स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यावे. लहानपणापासूनच मुलांना सर्व स्पर्धा परीक्षा द्यायला प्रवृत्त करायला हवे.

या सर्व परीक्षांचा अभ्यास केला तर असे आढळून येईल की या सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचा मुलभूत अभ्यास हा पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पक्का होतो. त्यामुळे शिक्षकांनी व पालकांनी मुलांना या शिष्यवृत्ती परिक्षांना बसविणे हे अत्यावश्यक आहे. वरील कोणत्याही शैक्षणिक प्रवेशासाठी व नोकर्यांसाठी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे. ह्या परीक्षांची तयारी जर आपण गांभीर्याने करून घेतली तर मुलांना स्पर्धा परीक्षांचा सराव होतो. कमीतकमी वेळेत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून प्रश्न सोडवणे, वेगाने विचार करणे, अंदाज बांधणे, ताण तणावावर मात करणे, एकाग्रता साधणे, फक्त घोकंपट्टी न करता लक्षात ठेवण्याचे तंत्रज्ञान हस्तगत करणे, वेळेचे नियोजन करणे, भाषांवर प्रभुत्व, निर्णय क्षमता इत्यादी गुण शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विकसित होतात. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या मुलांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक असून एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी. मध्ये हीच मुले अधिकारी म्हणून चमकताना दिसतात. म्हणून या शिष्यवृत्ती व इतर सर्वच शालेय स्पर्धा परिक्षांना लहान वयातच सर्वच मुलांना बसवून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर यापुढे कोकणातील मुलांना उच्च शिक्षण प्रवेशासाठी व सर्व नोकर्यांसाठी भविष्य निश्चितच चांगले असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.