PM KISAN | पी.एम किसान योजना गोष्ट छोटी, डोंगराएवढी

१ डिसेंबर २०१८ पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केली आहे. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार (२ हजार रुपये वर्षातून ३ वेळा) रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना जाहीर करताना शेतकऱ्यांसाठी चालू असलेली इतर अनुदाने चालूच राहणार असून त्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

ही रक्कम जरी छोटी वाटत असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही फार महत्वाची आहे. आपल्या देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला विशेषतः धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला लागवडीकरिता लागणारे बियाणे, खत व थोड्याफार मजुरीसाठी ही रक्कम वापरता येणार आहे. तसेच पूर्ण देशाचा विचार केला तर संपूर्ण देशात सध्या या योजनेनुसार ९.६७ कोटी शेतकऱ्यांना सुमारे १९ हजार कोटी रुपये एका हप्त्याचे म्हणजे सुमारे ५७ हजार कोटी एका वर्षात वितरीत केले जातात. अजून सर्वच शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीत. जेव्हा सर्व शेतकरी या योजनेत सामील होतील तेव्हा सुमारे ७५ कोटी रक्कम दरवर्षी शेतकऱ्यांना वितरीत केले जातील. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल.

या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. सरकारने सुरुवातीला २ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. परंतु नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

खालील लोकांना या योजनेतून वगळले आहे
१. सर्व संस्थात्मक जमीन धारक

२. खालील पैकी एक किंवा अधिक श्रेणी संबंधित शेतकरी कुटुंबीय

अ. संविधानीक पद धारण करणारे केलेले आजी व माजी व्यक्ती

ब. आजी/ माजी मंत्री/राज्यमंत्री , आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी-माजी विधानसभा/ विधानपरिषद सदस्य, आ जी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/ माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष

क. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील नियमित अधिकारी कर्मचारी (चतुर्थ श्रेणी गट ड कर्मचारी वगळून)

ड. सर्व निवृत्ती धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा जास्त आहे (चतुर्थ श्रेणी गटक कर्मचारी )

पी.एम. किसान योजनेसाठी नाव कसे नोंदवायचं

या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात अथवा ग्रामपंचायतीत जमा करू शकतात. यासाठी आधार कार्ड, सात/ बारा उतारा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स लागते. तलाठी किवा ग्रामसेवक आपल्या नावाची नोंद पी.एम. किसानच्या वेबसाईटवर करतील किवा आपण स्वतः www.pmkisan.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता. त्यासाठी तुम्ही www.pmkisan.com या वेबसाईट जावून आपले स्टेटस पाहू शकता किवा तलाठी किवा ग्रामसेवकाकडे जावून माहि ती मिळवू शकता.

हप्ता जमा झाला की नाही हे कसे समजेल?

तुमच्या खात्यात पी.एम. किसानचा हप्ता जमा झाला की नाही, हे तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जाईल किंवा वरील वेबसाईटवरही तुम्ही ते पाहू शकता.

अद्याप सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही. काही शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही तर काही शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे पण त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. पैसे न मिळण्याचे कारण एक तर त्यांच्याकडे आधार नाही किवा चुकीचा टाकला गेला आहे किंवा बँक खात्यात मोबाइल नंबर चुकीचा आहे. हे शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून हे क्रमांक दुरुस्त करू शकतात. आता केंद्र सरकारने या शेतकऱ्यांकरिता ०११-२४३००६०६ हा फोन नंबर दिला असून यावर फोन करून शेतकरी त्यांच्या अडचणी सांगू शकतील. जर एखाद्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची तक्रार करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published.