MANREGA | महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३ लाख रुपयांची विहीर बांधून मिळवली आत्मनिर्भरता

MANREGA | दत्ताराम गौरू म्हात्रे हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील भुते या गावातील अल्पभूधारक शेतकरी. स्वतःची जमीन होती परंतु या शेतीकरिता पाण्याची व्यवस्था नसल्याने फक्त पावसाळ्यात भातशेती करायचे. अर्थात भातशेती करणे हे सध्या परवडत नाही. त्यांची उन्हाळी भाजीपाला शेती करण्याची खूप इच्छा होती परंतु पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना ते शक्य होत नव्हते.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३ लाखाची विहीर बांधून मिळते असे समजले. यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांबरोबर संपर्क साधून त्यांच्या मदतीने अर्ज सादर केला. हा अर्ज ग्रामपंचायतीने पंचायत समितीमध्ये पाठविला. पंचायत समितीमध्ये हा अर्ज मंजूर होवून त्यांना विहीर बांधायला परवानगी मिळाली. ही विहीर पूर्ण होण्यासाठी त्यांना खूप पाठपुरावा करावा लागला. ग्रामपंचायत मान तर्फे झिराड व पंचायत समिती,अलिबाग येथील सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना उत्तम सहकार्य केले. त्यांनी शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करून दीड वर्षात विहीर बांधून पूर्ण केली.

आज ते त्यांच्या शेतात विहिरीच्या पाण्याने तोंडली, पांढरा कांदा, मिरची व इतर भाजीपाला पिकवून स्वतः बाजारात जावून विकतात. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ३ लाखाची विहीर बांधून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकरिता आत्मनिर्भरता मिळवली आहे.

वैयक्तिक सिंचन विहिर बांधण्यासाठी आवश्यक माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे घेण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या विहिरीसाठी ३ लाख रुपयांचे १०० टक्के अनुदान असून त्यात ६० टक्के मजुरी व ४० टक्के बांधकाम साहित्य खर्च अभिप्रेत आहे. यासाठी शेतकऱ्याकडे ६० गुंठे सलग शेतजमीन असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे कमी जमीन असेल असा शेतकरी शेजारील शेतकऱ्याबरोबर संयुक्तपणे विहीर घेण्याकरिता अर्ज करू शकतो.

वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे

१. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना वैयक्तिक सिंचन विहीर अर्ज
– हा विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने ग्रामपंचायतीमध्ये करायचा आहे.

२. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना वैयक्तिक सिंचन विहीर शासन निर्णय
– हा शासन निर्णय आपणास ग्रामपंचायत/ पंचायत समितीमध्ये मिळू शकेल

३. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना वैयक्तिक सिंचन विहीर अर्ज
– सिंचन विहीर प्रस्ताव सादर करणेबाबत मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना ग्रामपंचायत मार्फत सर्व कागदपत्रांसाहित मुख्य अर्ज.

४. ७/१२ प्रती
– ज्या जमिनीवर विहीर बांधायची आहे त्या जमिनीचे ७/१२, मा. तलाठी यांच्याकडील उतारे.

५. गाव नमुना ८ अ प्रती
– ज्या जमिनीवर विहीर बांधायची आहे त्या जमिनीचे गाव नमुना ८ – अ, मा. तलाठी यांच्याकडील दाखले.

६. अल्प भूधारक दाखला
– मा. तहसीलदार यांच्याकडून अल्पभूधारक शेतकरी असल्याचा दाखला.

७. संमतीपत्र/ प्रतिज्ञापत्र
– ७/१२ उताऱ्यावर अर्जदारा व्यतिरिक्त इतर नावे असतील तर त्या सर्वांचे मा. तहसीलदार यांच्या समोर तयार केलेले विहीर बांधण्याकरिता संमतीपत्र.

८. ग्रामसभा ठराव नक्कल (वैयक्तिक लाभार्थी निवड)
– ग्रामपंचायत हद्दीमध्ये सिंचन विहिरी बांधण्याबाबत झालेल्या ठरावाची नक्कल.

९. ग्रामसभा ठराव नक्कल (लेबर बजेट)
– ग्रामपंचायत हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेसाठी प्रस्तावित लेबर बजेटच्या ठरावाची नक्कल.

१०. नकाशा
– भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रस्तावित विहिरीच्या जागांचा एकत्रित नकाशा.

११. पाणी तपासणी
– हा दाखला मिळण्याकरिता ग्रामपंचायत भूजल सर्वेक्षण अधिकारी यांना लाभार्थ्यांच्या वतीने अर्ज करते. सदर अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून पाणी उपलब्धतेचा व प्रस्तावित विहिरीच्या आकारमानाचा दाखला देतात.

१२. सलग ६० गुंठे क्षेत्र तलाठी दाखला
– लाभार्थी शेतकऱ्याची सलग ६० गुंठे जागा असल्याबाबतचा तलाठी दाखला.

१३. बँक पासबुकची प्रत
– लाभार्थी शेतकऱ्याची राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या खातेपुस्तकाची प्रत.

१४. आधारकार्ड

१५. विहिरीपासून ५ पोलच्या अंतरावर विद्युत पुरवठा असल्याचा दाखला
– हा दाखला महावितरण कार्यालयाच्या अभियंत्याकडून प्राप्त करावा. सध्या शेतीसाठी शासनातर्फे सौरपंप उपलब्ध असल्याने याची आवश्यकता आहे की नाही याची खात्री करावी.

१६. प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला
– हा दाखला ग्रामपंचायत मार्फत मिळू शकतो.

१७. मृत्यूचे दाखले
– ७/१२ उताऱ्यावर जर इतर मृत्यू पावलेले भूधारक असतील तर त्यांच्या मृत्यूचे दाखले.

१८. सामायिक विहीर असेल तर संमतीपत्र
– शेतकऱ्याकडे ६० गुंठे स्वतःची जमीन नसल्यास, विहीर सामायिकपणे घ्यायची असल्यास इतर शेतकऱ्यांचे मा. तहसीलदार यांच्या समोर तयार केलेले विहीर बांधण्याकरिता संमतीपत्र.

वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी कार्यालयीन प्रक्रिया

वरील सर्व कागदपत्रांसहित अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना सादर करते. या अर्जाची छाननी होवून जर काही त्रुटी नसतील तर आपला अर्ज मंजूर केला जातो. त्रुटी असतील तर पूर्ततेकरिता पंचायत समिती, ग्रामपंचायतीकडे याबाबत माहिती कळवून त्रुटी पूर्ण करून घेते. हा अर्ज नंतर पाणीपुरवठा विभागात अंदाजपत्रक बनविण्यासाठी पाठविला जातो. या अर्जाची छाननी करून पाणीपुरवठा विभाग अंदाजपत्रक बनवून विहिरीच्या कामासाठी तांत्रिक मान्यता देते.

कामाची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर, पंचायत समितीचा प्रतिनिधी प्रत्यक्ष जागेवर येऊन विहिरीची जागा निश्चित करून देतो. यानंतर आपण विहिरीचे काम सुरु करू शकतो.

विहीर खोदण्याकरिता आवश्यक मजुरांची जॉबकार्ड बनविणे आवश्यक आहे. ही जॉबकार्ड ग्रामपंचायतीमार्फत बनविली जातात. लाभार्थी शेतकऱ्याचे सुद्धा जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. या विहिरीचे खोदकाम करण्यास इच्छुक जॉबकार्डधारक मजुरांचा रोजगार मागणीचा नमुना क्रमांक ४ चा अर्ज संयुक्तपणे प्रत्येक आठवड्याकरिता ग्रामपंचायतीकडे सादर करावा लागतो. हा अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे सादर करते. अर्ज मंजूर होवून प्राप्त झाल्यावर पंचायत समितीकडून येणाऱ्या कागदपत्रांवर हजर मजुरांच्या सह्या घेवून ग्रामपंचायत पुन्हा हे कागदपत्र पंचायत समितीकडे पाठविते व त्या नंतर या मजुरांची मजुरी प्रत्येक मजुरांच्या खात्यावर जमा केली जाते. साधारपणे १५ मजूर असल्यास ७ ते ८ आठवड्यात खोदकाम पूर्ण होवून मजुरांच्या खात्यावर सर्व मजुरी जमा केली जाते.

विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्यांच्या परवानगीने विहिरीचे बांधकाम चालू करू शकतो. या बांधकामाच्या साहित्याचे व बांधकाम मजुरांची मजुरी ही मात्र विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर मिळते. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची बिले घेताना करासहित म्हणजे जी.एस.टी. सहित घ्यावी लागतात.

ही सर्व कागदपत्रांची प्रक्रिया क्लिष्ट वाटत असली तरी कठीण नाही कारण बहुतेक सर्व गोष्टी ग्रामपंचायत व पंचायत समिती करीत असते. लाभार्थ्याला सुरुवातीला कागदपत्र गोळा करण्याची मेहनत करावी लागते व या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतो. पण एकदा का विहीर झाली की कमीत कमी ३ पिढ्या त्या विहिरीच्या पाण्याचा फायदा घेवून उत्तमरीत्या शेती करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.