Competative Exam | कोकणातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढता कल

नुकताच दहावी व बारावीचे निकाल लागले. नेहमीप्रमाणे या वर्षीसुद्दा कोकणातील विद्यार्थी उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपेक्षा अव्वल ठरले. या दरम्यान एम. पी. एस. सी. व यु. पी. एस. सी. चे निकाल लागले. पण या यादीत कोकणातील विद्यार्थी नाही दिसले. आतापर्यंत दरवर्षी या यादीत कोकणातील विध्यार्थी दिसतच नाहीत. कोकणातील विद्यार्थी दहावी, बारावी व पदवीपरीक्षेत हुशारी दाखवतात. पण कोणत्याही सरकारी नोकरीत मात्र अभावानेच दिसतात. मग ते प्रथमवर्गीय केंद्रसरकारी अधिकारी असो वा द्वितीय वर्गीय राज्यसरकारी अधिकारी. एवढेच नव्हे तर त्रितीय श्रेणी कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा कोकणातील विध्यार्थी अभावानेच आढळतात. बँका, इन्शुरन्स, रेल्वे, स्टाफ सेलेक्शन बोर्ड, वनखाते, संरक्षण इत्यादी खात्यात दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांची भरती होते पण कोकणातील विद्यार्थ्यांसाठी या सरकारी नोकऱ्या अजूनही खूप दूर आहेत.

याची कारणे खूप असली तरी मुख्य कारण म्हणजे मुंबई जवळ असल्याने सहज नोकऱ्या मिळत होत्या. बरीच हुशार मुले विज्ञान शाखा निवडून इंजिनिअर होत होती व सहज नोकऱ्या मिळवत होती. बाकीचे विद्यार्थी वेगवेगळ्या खाजगी नोकऱ्यात समाधान मानत होती अथवा व्यवसाय करत होती. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. शिक्षणाच्या सार्वत्रीकरणामुळे खाजगी नोकऱ्या मिळणे आता दुरापास्त झाले असून बेकारांची संख्या वाढत चालली आहे. बरेच इंजिनिअर आज बेकार असून काही कमी पगारात व पडेल ते काम करत आहेत. इतर विद्याशाखांमध्येसुद्धा बेकारांची संख्या खूप वाढत चालली आहे. व्यवसायांमध्ये सुद्धा स्पर्धा तीव्र झाली आहे. अशा वेळेस कोकणातील विध्यार्थी आता स्पर्धा परीक्षांद्वारे सरकारी नोकऱ्यांकडे आकर्षित होत आहे याचा प्रत्यय नुकताच चाणक्य मंडल पुणेचे संचालक व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या कोकण दौऱ्यात दिसून आला. त्यांच्या व्याख्यानाना विद्यार्थ्यांनी व पालकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली होती. अलिबाग मधील व्याख्यानास पी.एन.पी. नाट्यगृह तुडूंब भरले होते. जर खरोखरच कोकणातील विद्यार्थी आजपासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले तर येत्या चार पाच वर्षात सरकारी नोकऱ्यांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण निश्चीत वाढलेले दिसेल यात शंका नाही.

बहुतांशी सरकारी नोकऱ्यात भरती ही केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन बोर्ड मार्फत केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) नागरी सेवा परीक्षेतून देशातील २४ महत्त्वाच्या सेवांमध्ये अधिकारी निवडले जातात. या सेवांमध्ये आय.ए.एस.,आय.पी.एस., आय.आर.एस, आय.एफ.एस. या सारख्या सेवांचा समावेश आहे.

राज्य लोकसेवा आयोगा मार्फत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, सहायक विक्रीकर आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, मुख्याधिकारी – नगरपालिका/परिषद, अधीक्षक -राज्य उत्पादन शुल्क, तहसीलदार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, कक्ष अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक – राज्य उत्पादन शुल्क, सहायक आयुक्त – राज्य उत्पादन शुल्क, नायब तहसीलदार इत्यादी सेवांचा समावेश आहे.स्टाफ सिलेक्शन बोर्ड मार्फत त्रितीय व चतुर्थ श्रेणीच्या हजारो नोकऱ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. इयत्ता दहावी पासून पदवी पर्यंत पात्रता असलेले विद्यार्थी यास्पर्धा परीक्षा देऊन विविध सरकारी नोकऱ्या या सेवांमध्ये आय.ए.एस.,आय.पी.एस., आय.आर.एस, आय.एफ.एस. या सारख्या सेवांचा समावेश आहे.

मिळवू शकतात. बँकेतील नोकऱ्यांसाठी आय.बी.पी.एस. व स्टेट बँक स्पर्धा परीक्षा घेते. रेल्वे भरतीसाठी रेल्वे बोर्ड स्पर्धा परीक्षा घेते तर संरक्षण क्षेत्रातील इंटिलिजेन्स ब्युरो, सीबीआय, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, बीएसएफ, सीआरपीएफ, एसआरपीएफ, आर्मी, नेवी, एअरफोर्स या पदांसाठी विविध संस्था भरतीसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेत असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सारख्या पंचायतराज संस्था, कोर्ट, पोलीस, शिक्षक – प्राध्यापक व सर्व शासकीय तसेच निमशासकीय नोकऱ्या या विविध स्तरावर स्पर्धा परीक्षानेच भरल्या जातात.

या सर्व परीक्षांचा अभ्यास केला तर असे दिसून येते की सर्वसाधारणपणे या परीक्षांमध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा, इंग्रजी भाषा हे विषय अनिर्वार्य असतात. चतुर्थ श्रेणी पासून प्रथम श्रेणी नोकऱ्यांसाठी काठीण्य पातळी वाढत जाते पण विषय मात्र हेच असतात. तसेच इतर विषयांमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, घटना, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, व सर्वच क्षेत्रातील चालू घडामोडी या विषयांचा समावेश होतो.

स्पर्धा परिक्षापासून आता कोणालाच पळ काढता येणार नाही. स्पर्धा परिक्षाना टाळणारे सरकारी नोकरी मिळवू शकत नाहीत. म्हणून आता प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आवश्यक झाले आहे. या परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्याची भूमिका फार महत्त्वाची असली तरी शिक्षक व पालकांची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे. मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांचे विचार, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे वागणे हे मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास घडवून आणण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यांनी शाळेतील गुणांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांना बसवून आपल्या मुलाची गुणवत्ता तपासावी. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या थोडय़ा-थोडय़ाशा विषयात त्यांना न अडकवता, स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यावे. लहानपणापासूनच मुलांना सर्व स्पर्धा परीक्षा द्यायला प्रवृत्त करायला हवे.

स्पर्धा परीक्षांसाठी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे. ह्या परीक्षांची तयारी जर आपण गांभीर्याने करून घेतली तर मुलांना स्पर्धा परीक्षांचा सराव होतो. कमीतकमी वेळेत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून प्रश्न सोडवणे, वेगाने विचार करणे, अंदाज बांधणे, ताण तणावावर मात करणे, एकाग्रता साधणे, फक्त घोकंपट्टी न करता लक्षात ठेवण्याचे तंत्रज्ञान हस्तगत करणे, वेळेचे नियोजन करणे, भाषांवर प्रभुत्व, निर्णय क्षमता इत्यादी गुण शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विकसित होतात.

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा आवाका जरी मोठा असला तरी शालेय जीवनापासूनच अभ्यासाला सुरवात केल्यास यशाची शक्यता जास्त असते. यासाठी वैयक्तिक जीवनात शिस्त, अभ्यासाचे नियोजन व चिकाटीची आवश्यकता असते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धती, गुण देण्याची पद्धती याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजनही काटेकोरपणे करायला हवे. या अभ्यासासाठी दिवसातून कमीतकमी सरासरी आठ तास अभ्यास करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणे हे प्रत्येकालाच शक्य नसते. यासाठी वारंवार परीक्षा देणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षांसाठी अचूक मार्गदर्शनाची गरज असते. मोठ्या शहरांमध्ये चांगले क्लास उपलब्ध आहेत. कोकणात सुद्धा आता अशा प्रकारचे क्लास सुरु होणे आवश्यक आहे. कोकणातील शाळा – कॉलेजनी आता पुढाकार घेऊन हे क्लास सुरु करणे आवश्यक आहे तरच कोकणातील विद्यार्थी भविष्यात सरकारी नोकऱ्या मिळवतील.

Leave a Reply

Your email address will not be published.