Bamboo कलेचे उद्योगात रुपांतर करणारा अवलिया- विनोद रुईकर

Bamboo बांबू पासून बनविलेल्या अनेक गोष्टी विकणारी बुरुड समाजाची लोकं तुम्हांला कोकणात किवा महाराष्ट्रात कोणत्याही आठवडी बाजारात किवा रस्त्यावर तुम्हाला दिसतील. शेतकऱ्यांच्या जीवनात बांबूपासून बनविलेल्या अनेक गोष्टीना अनन्य साधारण महत्व आहे. मग त्या टोपल्या असोत वा सुपे. कोंबड्यांना झाकायला खुराडे असोत वा भात साठवणुकीसाठी कणगे. फुलांसाठी परडी, सुरडे, रोवळी, पांजरा, कुरकुली इत्यादी अनेक गोष्टी बुरुड समाजातील लोकं विक्रीसाठी बनवीत असतात व आपला उदरनिर्वाह त्यावर करीत असतात.

आज प्लास्टिकचा वापर वाढल्याने बांबूपासून बनविलेल्या वस्तूंचा खप जरी कमी झाला असला तरी सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्या बांबूपासून बनविलेल्या गोष्टीना आजही पर्याय नाही. आज इको फ्रेंडली समाजात बांबू व बांबूपासून बनविलेल्या गोष्टींचे स्थान उंचावल्याचे दिसत आहे.

बांबूपासून बनविलेले फर्निचर

अलिबाग तालुक्यातील समुद्र काठी वसलेल्या थळ या गावात बुरुड समाजातील काही कुटुंब राहतात. विनोद रुईकर यांचे वडील दामोदर रुईकर हे त्या समाजातील एक गृहस्थ. यांचा बांबूपासून सुपे, रोडी, टोपल्या, खुराडे इत्यादी पारंपारिक वस्तू तयार करून विक्री करण्याचा परंपरागत व्यवसाय. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चाले.

पारंपारिक वस्तूंबरोबरच आधुनिकतेचा साज चढवून बांबूपासून विविध कलाकृती तयार करून, त्याचा वापर विविध प्रकारे होऊ शकतो हे दाखविणारा एक कलावंत थळ येथील बुरुड समाजातच निर्माण झाला आणि त्यांनी बांबूचा वापर करून अनेक कलाकृती निर्माण केल्या. त्यात अनेक बक्षिसे मिळून उज्ज्वल यश संपादन केले, ते अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला कलावंत म्हणजे अलिबाग तालुक्यातील थळ येथील विनोद रुईकर.

बांबूपासून बनविलेले LAMPS

घरातील कुटुंबाचा बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू विनोद लहानपणापासून पाहत आलेला असल्याने या कलाकृती पाहून त्या आत्मसात करून तयार करण्याकडे विनोद चा ओढा अधिकच वाढत गेला. बांबू पासून आधुनिक पद्धतीच्या वस्तू तयार करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि नावीन्याचा शोध घेत लोकांना आवडेल अशा कलाकृती तयार करण्याकडे त्यांनी लक्ष पुरविले. विनोदचे शिक्षण अलिबाग येथेच झाले. गावातील राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर या कंपनीने या गुणी मुलाला हेरून त्याच्या शिक्षणासाठी पुढाकार घेवून कंपनीतच नोकरी देऊन सामावून घेतले आणि खऱ्या अर्थाने विनोद रुईकरांना आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्ट्या स्थैर्य प्राप्त झाले.

उपजतच हाडाचा कलाकार असलेल्या विनोद रुईकरांना बांबूच्या कलाकृती पुन्हा खुणावू लागल्या. एव्हाना पारंपरिकरीत्या बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात त्यांचा हातखंडा झाला होताच. फुलदाणी, लग्नाच्या वेळच्या रुखवतातील शोभेच्या वस्तू, होडी, बैलगाडी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक पद्धतीच्या सुंदर सुंदर कलाकृती बनविण्याचा रुईकर प्रयत्न करू लागले व या प्रयत्नांना मित्रपरिवाराकडून वाहवा व प्रोत्साहन मिळत गेले. यामुळे त्यांच्यातील प्रयोगशील कलावंत मोठी भरारी घेण्यासाठी सिद्ध होत होता. तयार करण्यात येणाऱ्या कलाकृतीतून त्यांची माऊथ टू माऊथ पब्लिसिटी आपोआप होत गेली. रुईकर यांनी आपल्या कलेची जिद्द कायम ठेवून हळूहळू गणेशोत्सवातील गणपतीसाठी बांबूचे मखरे बनवण्यास सुरुवात केली व त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

बांबूपासून बनविलेल्या कलाकृती

ही सर्व घौडदौड चालू असताना त्यांची गाठ पडली ती रायगडचे तत्कालीन समाज कल्याण अधिकारी प्रमोद जाधव यांच्याशी. हे प्रमोद जाधव मूळचे अलिबाग येथीलच. बुरुड समाजातील एक युवक आपल्या पारंपारिक कलेला आधुनिकतेचा स्पर्श देवून त्याला समाजमान्यता मिळवून देण्यासाठी धडपड करतोय हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांची बांबूपासून विविध वस्तू बनविण्याची हातोटी पाहून प्रमोद जाधव यांनी त्यांना रायगड मधील पाली येथे आयोजित केलेल्या बांबूचे फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी सुचवले. या शिबिरात प्रशिक्षण घेतल्याने विनोद रुईकर यांच्या बांबू कलेला एक वेगळी दिशा मिळाली. तसेच त्यांना बांबू उद्योगाचे जागतिक भान आले. त्यातूनच प्रमोद जाधव यांच्या प्रयत्नातून खंडाळा येथील बांबू उद्योगावर आयोजित जिल्हा मार्गदर्शन शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्याची त्यांना संधी मिळाली.

या दरम्यान आरसीएफ मध्ये नाट्य चळवळ जोमात सुरू होती. तिथे रुईकर यांची गाठ पडली ती प्रसिद्ध नाट्यकलावंत चंद्रशेखर लिमये यांच्या बरोबर. या पहिल्या भेटीतच त्यांची मैत्री झाली. या माध्यमातून अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी, शहाफत खान, वामन केंद्रे, राजीव नाईक, प्रतिमा कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, राजन भिसे, संजय नार्वेकर, कमलाकर नाडकर्णी अशा एकाहून एक दिग्गजांबरोबर राहण्याची, ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. चंद्रशेखर लिमये यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक एकांकिका व नाटके बघता बघता त्यातील तांत्रिक अंगामध्ये त्यांना विशेष रस वाटू लागला.

त्याच वेळी कंपनीतील एक नाट्यकलावंत किशोर म्हात्रे यांनी विनोद रुईकरांना अलिबागच्या साईप्रसाद ज्ञानदीप मंडळाच्या, प्रसाद ठोसर लिखित “रंग माझा तुला” या नाटकाच्या रंगमंचावरील नेपथ्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी संपूर्ण बांबूपासून सेट बनवून ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. या त्यांच्या नेपथ्याला महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. “वाळूच टरफल” या नाटकाच्या नेपथ्याला सुद्धा राज्य नाट्यस्पर्धेत त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर “रन्ध्रांवेशन” या नाटकाच्या प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषक, सन २०१८ चा कलाभूषण पुरस्कार, सन २०१९ मध्ये नेपथ्यासाठी कोकण नाट्य करंडक प्रथम क्रमांक इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. रायगड जिल्हा परिषदेने त्यांच्या या कलेची दखल घेऊन त्यांना “रायगड भूषण” हा पुरस्कार दिला.

बांबूपासून बनविलेल्या कलाकृती

किशोर म्हात्रे यांनी त्यांना लग्नसमारंभातील रंगमंचावर बांबूपासून बनविलेल्या विविध कलाकृतींचा सेट उभारण्याची सूचना केली. बाम्बुंच्या कलाकृती, त्यात लाईट इफेक्ट्स व विविध फुलांच्या आकर्षक सजावटीने बनविलेला सेट रायगडवासियांचे आकर्षण ठरू लागला.

नुकताच त्यांनी बांबूचा वापर करून कलात्मक पद्धतीने साकारण्यात आलेल्या विविध वस्तूंचे भव्य दालन अलिबाग-रेवस रस्त्यावर अलिबागपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर राजमाला येथे सुरु केले आहे. खुर्च्या, टेबल, सोफासेट, देव्हाऱ्यासाठी मखरे, घर सजावटीसाठी वेगवेगळ्या कलाकृती इत्यादी वस्तू त्यांनी बनवून विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्याच बरोबर बांबू पासून बनविलेले स्त्रियांसाठी विविध अलंकार सुद्धा विक्रीस ठेवले आहेत. या दालनाची रचना इतकी आकर्षकरित्या केली आहे की कितीही पाहत राहिले तरी मन भरत नाही. थोड्याच कालावधीत हे दालन अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

हे दालन बलुतेदार असलेल्या नवतरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या पारंपारिक व्यवसायातील कलेला जर आधुनिकतेचा साज दिला व आपल्यातील प्रतिभा व कौशल्य यांच्या साह्याने ग्राहकांच्या गरजा ओळखून व्यावसायिकता जपली तर चांगला उद्योग उभा राहू शकतो हा आदर्श विनोद रुइकरानी तरुणांसमोर ठेवला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.