रोहितची IIM ची स्वप्नपूर्ती

श्रीकांत गोविंद शेडगे हे पेण येथील छोटे दुध उत्पादक शेतकरी. ते दुधाचा व्यवसाय करीत. गुरांना अन्न म्हणून भाज्यांतील निवडून काढलेले भाग विकत घेण्यासाठी ते सकाळी लवकर भाजी मार्केटमध्ये येत असत. त्यांना रोज रस्त्यावर एक ब्लेझर घालून कॉलेजला जाणारा मुलगा दिसे. एकदा त्यांनी उत्सुकतेपोटी या मुलाला – आदित्यला तो काय शिकतो हे विचारले. तेव्हा BMS (Bachelor of Management Studies) या अभ्याक्रमाविषयी त्यांना माहिती मिळाली. आदित्यने IIM काशीपुर ही देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था असून तेथील पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम म्हणजेच एम.बी.ए. केल्यास आपल्याला देश विदेशात चांगली नोकरी मिळून आपले करिअर उत्तम होवून वार्षिक काही लाखाचा पगार मिळू शकतो असे सांगितले. रोहितच्या वडिलांनी ही गोष्ट आपली पत्नी व मुलगा रोहितला सांगितली. रोहितला दहावीत ९५ टक्के गुण मिळालेले ऐकून या आदित्यदादाने त्याला CAT आणि IIM ची माहिती दिली. आणि रोहित व त्याच्या आई-बाबांनी IIM चे स्वप्न पाहिले.

पालक आणि विद्यार्थी मिळून जेव्हा एखादे स्वप्न पाहतात तेव्हा स्वप्नपूर्तीची वाट सुखाची होऊन जाते, कारण पालकांचे वात्सल्य, मुलांना पालकांविषयी वाटणारा प्रेमादर याच्या समन्वयाची खंबीर साथ प्रवासाला मिळालेली असते. रोहितची नुकताच MBA पूर्ण होवून कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड झाली आहे. बंगलोर येथील टाटा पॉवर या कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तो रुजू झाला आहे.

रोहितचे शालेय शिक्षण “मराठी माध्यमात” झाले. ८ वी नंतर त्याने “सेमी इंग्रजी” घेतले होते. ध्येय निश्चित असेल तर अडथळे पार करण्यासाठी मदत ही आपोआप मिळत जाते. रोहितच्या गोष्टीत त्याचे स्वप्न जितके महत्वाचे आहे, तितकाच त्याचा पाठपुरावा महत्वाचा आहे आणि या पाठपुराव्यात त्याच्या पालकांचा सहभाग तितकाच आनंददायी आहे. इयत्ता ८ वी पर्यंत रोहितची आई रोहितचा सगळा अभ्यास घेत असे हे इथे नमूद केले पाहिजे. दहावीला ९५ टक्के अधिक गुण मिळविलेल्या रोहितने अकरावीला वाणिज्य शाखा निवडली तेव्हा त्याच्या या निर्णयात पालकांचीही साथ मिळाली हे ओघानेच आले. बारावीत पुन्हा पेणमधील त्याच्या शाळेत रोहित (तिन्ही शाखांत) पहिला आला आणि त्याने BCom च्या पदवीसाठी त्याच्या शाळेच्या संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला व BCom पूर्ण केले.

वाचनाची आवड

इयत्ता ५ वीत असतानाच रोहितने शिवाजी सावंतांची “छावा” ही कादंबरी वाचली होती, ही गोष्ट त्याच्या भाषेवरील प्रभुत्वाची खूण आहे. इयत्ता १० पर्यंत त्याने बरीच मराठी पुस्तके वाचली. इयत्ता ९ वीपासून त्याने इंग्रजी पुस्तके वाचायला सुरुवात केली. त्याच्या आईलाही वाचनाची प्रचंड आवड असून त्या भरपूर वाचन करतात. त्यामुळेच रोहितला मराठी पुस्तके वाचण्याची गोडी लागली आणि इंग्रजी वाचन नैसर्गिक विकासातून सूरु झाले. एका भाषेवर प्रभुत्व असले की दुसरी भाषा शिकणे तुलनेने खूप सोपे जाते यावर रोहित आणि प्रस्तुत लेखक यांचे एकमत आहे. वाचनातून रोहितला उद्योग-व्यापार क्षेत्राची बरीच माहिती झाली. टाटा, बिर्ला, अंबानी ही नावे सर्वच भारतीयांना भुरळ घालतात, रोहित त्याला अपवाद नव्हता.

सुबोध गाडगीळ या पहिल्या परीवर्तन दूताची भेट

पेणमधील सुबोध गाडगीळ हे पेणमधील “परीवर्तनाचे दूत” मानले जातात. पेणमधील कुणीतरी CAT ची तयारी करत आहे याचे सुबोध यांना अतिशय अप्रूप आणि कौतुक वाटले. आणि त्यांनी रोहितला CAT ची तयारी करण्यासाठी योग्य पुस्तके तर निवडून दिलीच, त्याशिवाय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शनही केले. Times of India मधील Functional प्रकारचे इंग्रजी तर The Hindu वर्तमानपत्रातील Higher इंग्रजी यातील वैशिष्ट्ये रोहितला त्यांनी समजावून दिली. त्यातून सुरु झाली रोहितची “इंग्रजीची साधना”. वही करणे, त्यात न समजणारे शब्द व त्यांचे अर्थ लिहिणे, भाषिक खाचाखोचांची नोंद ठेवणे सुरु झाले. त्या वहीचा आज एक “मिनी ग्रंथ”च झाला आहे, असे रोहित मोठ्या अभिमानाने सांगतो. इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी रोहित त्याच्या इंग्रजीच्या शिक्षिका – साठे मॅडम यांचे ऋणही कृतज्ञ मनाने मान्य करतो. त्यांनी व्याकरणाचा पाया मजबूत करुन घेतला असे तो सांगतो. संभाषणात्मक इंग्रजीसाठी रोहितने “कारमेल स्कूल” मधील एका मुलाशी (जो त्याच्या वडीलांच्या मित्राचा मुलगा होता) आवर्जून मैत्री केली. दोघांना एकमेकांशी इंग्रजी बोलण्यात अत्यंत आनंद मिळत असे.

अतुल वैद्य या दुसऱ्या परीवर्तन दूताची भेट

दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळीच रोहितच्या जीवनात पेणमधील दुसरे “परीवर्तनाचे दूत” अतुल वैद्य दाखल होतात. अतुल वैद्यनी रोहितचे मेंटॉरिंग तर केले, त्याला अनेक पुस्तके वाचायला प्रवृत्त केले आणि मुख्य म्हणजे त्याला संगणक आणि इंटरनेटचा अमर्याद वापर करण्याची सुविधा त्यांच्या कार्यालयात दिली. त्यांच्याकडे तासंतास रोहित अभ्यास करत असे.

सुबोध आणि अतुल यांच्या रुपात असलेले चेंज एजंटस् आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी अत्यंत आशादायी आधारस्तंभ आहेत. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ शून्य आहे. ते त्यांच्या क्षेत्रात लिजंडस् आहेतच पण त्यांची दूरदृष्टी उल्लेखनीय आहे. अशा मार्गदर्शकांमुळेच रोहितसारख्यांची स्वप्ने साकार होण्यासाठी पोषक भूमी निर्माण होत असते, जिथे ही स्वप्ने यापूर्वी क्वचितच रुजली आहेत.

काय आहे IIM

IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ही भारतातातील सर्वोत्तम व्यवस्थापन शिक्षण देणारी शैक्षणिक केंद्रे. भारतामध्ये अहमदाबाद, बंगलोर, कलकत्ता, लखनौ, कोझिकोडे, इंदूर, रायपुर, रोहतक, रांची, तिरुचिरापल्ली, उदयपूर, काशीपुर, शिलाँग, विशाखापट्टणम, अमृतसर, नागपुर, बोध गया, सिरमौर, संभलपुर, जम्मू आणि अशी एकूण २० IIM शिक्षण संस्थाने आहेत. भारतामध्ये अहमदाबाद, बंगलोर, कलकत्ता, लखनौ, कोझिकोडे, इंदूर या IIMs ना पहिल्या पिढीतील IIM समजली जातात. रायपुर, रोहतक, रांची, तिरुचिरापल्ली, उदयपूर, काशीपुर या IIMs ना दुसऱ्या पिढीतील किंवा New IIMs म्हणतात तर शिलाँग, विशाखापट्टणम, अमृतसर, नागपुर, बोध गया, सिरमौर, संभलपुर, जम्मू या IIMs ना तिसऱ्या पिढीतील किंवा Baby IIMs म्हणतात.

प्रवेशासाठी CAT परीक्षा

या सर्व IIMs मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही पदवी प्राप्त केल्यानंतर किवा शेवटच्या वर्षात शिकत असताना कॅट म्हणजेच कॉमन ॲडमिशन टेस्ट द्यावी लागते. सर्व IIMs साठी एकच टेस्ट असते. जास्त पर्सेंटाइल मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या पिढीतील कॉलेजेस मिळतात त्या खालोखाल दुसऱ्या पिढीतील आणि तिसऱ्या पिढीतील कॉलेजेस मिळू शकतात. या प्रवेश पात्रता परीक्षेस प्रत्येकी ६० मिनिटांचे तीन स्वतंत्र पेपर्स (Verbal Ability & Reading Comprehension, Data Interpretation and Logical Reasoning, Quantitative Ability) असतात. एकुण १०० प्रश्न असतात. पहिला विभाग इंग्रजी भाषेतील कौशल्यावर आधारित, दुसरा बुध्दिमापनाचा तर तिसरा गणिती कौशल्यांचा असतो. गणितात १० वीच्या पातळीचे गणित गृहित धरलेले असते. परीक्षा संगणकावर घेतली जाते, प्रत्येक अचूक उत्तरासाठी ३ गुण मिळतात, तर चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कापला जातो (Negative Marking). या प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नंतर ग्रुप डिस्कशन व इंटरव्यू घेतली जाते. त्यात संवादकौशल्ये, बुध्दिमत्ता, जलद प्रतिसाद देण्याची क्षमता यांचा कस लागतो. यामधून नंतर अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली जाते. दरवर्षी सुमारे दीड लाख विद्यार्थी CAT या MBA प्रवेश परीक्षेला सामोरे जातात, त्यातील पहिल्या ३००० मुलांना IIM (Indian Institute of Management) या प्रतिथयश संस्थेच्या एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. म्हणजे केवळ पहिल्या २ टक्के विद्यार्थ्यांचे IIM चे स्वप्न पूर्ण होत असते.

रोहितची अभ्यासाची तयारी

रोहितने दहावीनंतरच अभ्यासाची तयारी सुरू केली होती. मात्र Ty BCom च्या शेवटच्यावर्षी रोहितने Triumphant Institute of Management Education Pvt. Ltd. (T.I.M.E.) या संस्थेच्या कोचिंगसाठी प्रवेश घेतला. अशा कोचिंगचा उपयोग “नेमका/सोपा मार्ग सापडण्यासाठी” उपयोग होतो असे रोहित सांगतो. Trial-Error प्रकारे स्वत: शिकताना आपण बऱ्याचदा कठीण रस्ते निवडण्याची शक्यता असते असे त्याचे मत आहे. सुमारे ४०००० रु. शुल्क असणारा हा कोर्स त्याला फायदेशीर ठरला असे त्याचे मत आहे. टाईमचा कोर्स लावूनही पहिल्या प्रयत्नात रोहितचा स्कोअर ५६ पर्सेंटाईल आला, म्हणजे अपयशच.

मात्र त्या वर्षी रोहित TY BCom परीक्षेचा अभ्यास प्राधान्याने करीत होता, आणि CAT ची परीक्षा त्याने केवळ स्वत:चा “दम आजमावण्यासाठी” दिली होती. रोहितसाठी खरी महत्वाची परीक्षा होती, एक वर्षानंतर येणारा CAT चा दुसरा प्रयत्न. या प्रयत्नात त्याने “जी जान लगाके” मेहनत केली होती. टाईम आणि करियर लॉन्चर अशा दोन मॉक टेस्ट त्याने लावल्या होत्या. CAT परीक्षेत तुम्हाला “किती येते” त्यापेक्षा तुम्ही “किती जलद” उत्तरापर्यंत पोहोचू शकता याला महत्व असते. करियर लॉन्चरच्या मॉक टेस्टमध्ये एक्सपर्ट टीचर स्वत: पेपर सोडवितात, आणि वेळेचे व्यवस्थापन करुन त्यांनी सोडविलेल्या पेपरचे रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाते. यातून अनेक ट्रिक्स, शॉर्टकटस् विद्यार्थ्यांना समजतात. रोहितने CAT चा दुसरा प्रयत्न “जी जान लगाके” केला, आणि ९५ पर्सेंटाईल मिळविले. त्याचे हे गुण त्याला Third Generation IIMs पर्यंत घेऊन जाऊ शकत होते. मिळालेले यश उत्तुंग असले तरी त्याला ते पुरेसे वाटत नव्हते. त्यामुळे अजून एक प्रयत्न करायचे त्याने ठरविले. तिसऱ्या प्रयत्नात पुरेपुर प्रयत्न करुन रोहितने ९६.८ पर्सेंटाईलची मजल गाठली. ९९+ चे स्वप्न साकारणे शक्य न झाल्याने रोहित आणखी एक प्रयत्न करायचा विचार करीत होता परंतु त्याच्या पालकांनी व अतुलने त्याला परावृत्त केले व त्याने अखेरीस Kashipur येथे प्रवेश घेतला. IIM, Kashipur चे शुल्क सुमारे १६ लाख रुपये होते. मात्र IIM च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज त्यांच्या IIM च्या पहिल्या दिवशी अत्यंत सन्मानपूर्वक मिळवून देण्याची सुविधा अनेक बॅन्का देतात. त्यासाठी तारण देण्याचीही गरज नसते MBA करणाऱ्या विद्यार्थ्याने Excel (Basic and Advanced), Powerpoint, Financial Statement Analysis using advanced tools, Financial Modeling & Valuation, Google Analytics, Digital Productivity Tools या संगणक-तंत्रांची कौशल्ये आधीच शिकणे उपयोगाचे ठरते.

रोहितची स्वप्नपूर्ती

रोहितने नुकताच IIM, काशीपुर येथून MBA ची पदवी संपादन केली. त्याला टाटा उद्योगसमुहातील एका आस्थापनेमध्ये नोकरी मिळाली. रोहितने हे स्वप्न प्रत्यक्षात कसे उतरविले त्याची ही कथा. इथे त्याच्या पालकांचा मोठेपणा दिसून येते. त्यांचा रोहितच्या स्वप्नांवर विश्वास होता. त्याची उच्च बुध्दिमत्ता, स्वप्नांची स्पष्टता, पालकांचा सहभाग आणि पाठींबा, सुबोध आणि अतुल सारख्यांची निरपेक्ष मदत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रोहितचे सातत्यपूर्ण परिश्रम, त्याचे टेंपरामेंट व लढाउ वृत्ती. रोहितची ही गोष्ट, अशा अनेक रोहितांच्या स्वप्नांसाठी कणभर पाठबळ म्हणून, सर्व पालक/विद्यार्थ्यांना शुभेच्छांसह सादर!

लेखक -मंदार परांजपे (BE Electronics)विज्ञान शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published.