पी.एम.स्वनिधी योजनेतून पथविक्रेत्याला मिळत आहे १०००० रुपये भांडवल

करोनाच्या महामारीत सर्वच समाजाला कमी अधिक प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शहरातील रस्त्यांवर विविध वस्तू विकणारे अथवा सेवा देणारे छोटे शहरी विक्रेते हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्वाच्या घटकाचे प्रतिनिधित्व करतात. शहरवासीयांच्या दारात स्वस्त दरात वस्तू व सेवा पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम हे पदपथ विक्रेते निभावत असतात. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाज्या, फुले व फळे तसेच खाण्याच्या वस्तूंमध्ये वडापाव, समोसा, पकोडा, पावभाजी, ब्रेड, अंडी इत्यादी, तसेच चहा, कॉफी, सरबते ग्राहकांना स्वस्त दारात विकण्याचे काम करीत असतात.

तसेच विविध प्रकारचे कपडे, पादत्राणे, गृहपयोगी वस्तू , पुस्तके / स्टेशनरी इत्यादी अनेक वस्तू रस्त्यावर विकून हे पथ विक्रेते आपला उदरनिर्वाह करीत असतात. मोची, पानाच्या टपऱ्या, कपडे धुवून देणे तसेच इस्त्रीची दुकाने सुद्धा ग्राहकांना सेवा देत असतात.

कोविड – १९ या साथीच्या रोगाने व ही साथ आटोक्यात येण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनने या पथ विक्रेत्यांच्या जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. या छोट्या व्यावसायिकांना अतिशय कमी भांडवलाची गरज असते. या लॉकडाऊनमध्ये त्यांना परत रस्त्यावर त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याकरिता त्यांना भांडवल मिळवून देण्यासाठी पी.एम. स्वनिधी (PM SWANIDHI YOJANA) ही एक विशेष मायक्रो-क्रेडिट सुविधा केंद्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेनुसार शहरातील नोंदीत पदपथ विक्रेत्याला तारणाशिवाय दहा हजार रुपयांचे भांडवल देण्याचे काम या पी.एम. स्वनिधि (PM SWANIDHI YOJANA) योजनेद्वारा करण्यात येत आहे.

आपल्याला माहित आहेच की केंद्रसरकारच्या “आत्मनिर्भर भारत” या योजनेत २० लाख कोटी पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पी.एम. स्वनिधी या योजनेनुसार सुमारे ५० लाख पथविक्रेत्यांना १० हजार रुपये कर्जरूपाने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत २५ लाखापेक्षा जास्त पथविक्रेत्यांनी अर्ज केले असून त्यापैकी आतापर्यंत १२ लाख ६० हजारांपेक्षा जास्त प्रकरणे मंजूर झाली आहेत. ६ लाखांपेक्षा जास्त पथविक्रेत्यांच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

भांडवल

या योजनेनुसार या पथ विक्रेत्यांना १ वर्षाच्या मुदतीसाठी दहा हजार रुपयाचे कर्जरूपी भांडवल देण्यात येत आहे. या भांडवलाची पथ विक्रेत्याने मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करायची आहे.

व्याज दर

या कर्ज भांडवलाचा व्याज दर हा वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका , लघु वित्त बँका, सहकारी बँका आणि बचत गट बँकांच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे असतील.

व्याज अनुदान

या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले व नियमित मासिक हप्ते भरणाऱ्या विक्रेत्यांना ७% व्याज अनुदान मिळणार असून व्याज रक्कम तिमाही कर्जदाराच्या खात्यात जमा केली जाईल. तसेच कर्जाची परतफेड वेळेत केल्यास त्यांना नंतर जास्त रक्कमेचे कर्ज मिळू शकेल. जर पथ विक्रेत्याने डिजिटल आर्थिक व्यवहार केले तर त्यांना काही प्रमाणात प्रोत्साहन (incentive) रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील.

या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

१. आधार कार्ड

२. मतदान ओळख पत्र

३. बँक पासबुक

४. रेशनकार्ड

५. डोमेसाईल प्रमाणपत्र

६. पॅन कार्ड

७. बाजार फी वसुली पावती

८. आधारलिंक मोबाईल क्रमांक

९. एक पासपोर्ट साईझ फोटो

लाभार्थी पात्रता निकष

दिनांक २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेते

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र ओळखपत्र असलेले पथविक्रेते

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र/ ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जे पथविक्रेते वगळले आहेत किवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि त्यात नागरी संस्थांनी किवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जरी केले आहे

आसपासच्या ग्रामीण भागातील पथविक्रेते नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक क्षेत्रात पथविक्री करतात आणि त्यास नागरी संस्थेने किवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जरी केले आहे.

अर्ज भरण्याकरिता पोर्टल

https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या पोर्टलवर जावून “APPLY FOR LOAN” या बटनावर क्लिक करून पथविक्रेता अर्ज करू शकतो. अर्ज भरताना वरील सर्व कागदपत्रे जवळ असणे आवश्यक असून आधार लिंक केलेला मोबाईल सुद्धा बरोबर असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या महानगरपालिका, नगरपालिका अथवा नगरपरिषदे बरोबर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.