कसे उभारावे एक एकर शेतीत पर्यटन व्यवसायाचे आदर्श शाश्वत मॉडेल

आज कोरोनाच्या महामारीमुळे व कोकणात आलेल्या विविध नैसर्गिक संकटांमुळे कोकणी माणसाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.  गेल्यावर्षी ” निसर्ग” चक्री वादळात नारळी – सुपारीच्या व आंब्याच्या वाड्या उध्वस्त झाल्या आहेत. मच्छीमार व पर्यटन व्यावसाईकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भातशेती ही अगोदरच तोट्याची झालेली आहे.

 भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर हा कोरोना काळात घटत असल्याचे दिसत असले तरी , “प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर” वसुली झपाट्याने वाढत आहे. निर्यातीत वाढ होत आहे. शेअरबाजाराने उच्चांक गाठला आहे. परदेशी चलनाची गंगाजळी वाढली आहे. श्रीमंत हे अधिक श्रीमंत बनत चालले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला संपत्तीचे असमान वाटप मात्र जसे आहे तसेच आहे. श्रीमंत व गरीब यांची दरी मात्र आहे तशीच आहे. याचे कारण मोठे उद्योगधंदे वाढत असताना छोटे व्यवसाय मात्र अस्तित्वासाठी झगडत आहेत. ऑनलाईन कपन्या प्रचंड व्यवसाय करीत असून, ह्या कंपन्या छोट्या व्यवसायाना हळूहळू संपवत चालल्या आहेत व त्यामुळे बेकारीची समस्या ही देशाच्या विकासाचे आकडे वाढत असताना जशीच्या तशीच आहे.

कोकणाचा  विचार करता औद्योगिक वाढ आता पूर्णपणे थांबल्यात जमा आहे. उलट सर्व औद्योगिक वसाहती मधील कारखाने बंद पडत आहेत. मुंबई पुण्यातील रोजगार सुद्धा आता घटले असून कोकणातील शिक्षित तरुण तरुणी नोकरीच्या विवंचनेत सापडली आहेत. ऑनलाईन व्यवसायामुळे स्थानिक विक्रेत्यांची घटलेली विक्री व तीव्र स्पर्धा, जमिनींचे थांबलेले विक्री व्यवहार, घरांची घटलेली मागणी, शेतीची झालेली दुर्दशा, रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पर्यटन व्यवसायचे मोडलेले कंबरडे यामुळे येथील जनतेसमोर रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.

पर्यटन व्यवसायच कोकणचा उत्कर्ष करू शकतो.

महाराष्ट्राला  मिळालेला ७२० किमीचा समुद्र किनारा, समृद्ध ऐतिहासिक वारसा व निसर्ग, मुबलक व ताजी मिळणारी मासळी, सुपीक शेती व नारळीफोफळीच्या बागा, आमराया, मुंबई व पुण्यापासून अगदी निकटता यांचा विचार करता या सर्व वरील घटकांना साजेसा व्यवसाय, जर कोकणचा उत्कर्ष करू शकेल तर तो पर्यटनच आहे या बद्धल शंकाच नाही. परंतु या पर्यटनाला शेती, मत्स याची जोड दिली व स्थानिक पायाभूत व्यवस्था सुधारल्या तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकेल. सध्याचे शेतकरी, बागायतदार व मत्स्य तलाव व्यावसाईक जर पर्यटनाची जोड आपल्या व्यवसायाला देतील व पर्यटनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय करतील तर कोकणामध्ये अर्थक्रांती होईल यात तिळमात्र शंका नाही.

पर्यटकांचे पहिले आकर्षण म्हणजे समुद्रकिनारे व त्यातील खेळ (वॉटर स्पोर्टस्), डोंगरदऱ्या तसेच ऐतिहासिक ठिकाणे. कोकणात या गोष्टींची वानवा नाही. दुसरे आकर्षण म्हणजे चविष्ट जेवण. इथे ताज्या व चांगल्या प्रकारच्या समुद्री व गोड्या पाण्यातील माशांची मुबलकता आहेच पण गावठी चिकन व मटण सुद्धा उपलब्ध आहे. आगरी व कोकणी  पद्धतीचे जेवण हे खूपच प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यात “पोपटी” सुद्धा शाकाहारी/ मांसाहारी पर्यटकांचे जिभेचे चोचले पुरवण्याचे काम करते. तरी सुद्धा कोकणातील पर्यटन व्यवसाय म्हणावा इतका बहरलेला नाही याची बरीच कारणे आहेत.

कोकणातील पर्यटन व्यवसायातील अडथळे

पहिले महत्वाचे कारण म्हणजे रस्ते. यामुळे कित्येक वर्ष पर्यटनाचा विकास रोडावला आहे. मुंबई ते गोवा हा महामार्ग कित्येक वर्षे रखडलेलाच आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे आजही पर्यटक कोकणात यायला तयार नसतात. पण येत्या काही काळात हे रस्ते निश्चित सुधारतील अशी आशा निर्माण झाली असून मुंबई-मांडवा(अलिबाग) ही रो-रो सेवा सुरु झाली आहे.  मुंबई-काशीद(मुरुड) व इतर कोकणात अनेक सागरी रस्ते प्रस्तावित आहेत. ही समुद्री प्रवाशी वाहतूक सेवा भविष्यात अनेक ठिकाणी सुरु होणार असल्याने पर्यटनाला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरे कारण म्हणजे ऐतिहासिक वारसांच्या बद्धल अनास्था व मार्केटिंगचा अभाव. आज कित्येक ऐतिहासिक स्थळे प्रकाशात आलेली नाहीत, त्यांचा विकास केलेला नाही किवा त्यांचे मार्केटिंग होत नाही. आक्षी येथील सर्वात जुना मराठी शिलालेख, चौल येथील भव्य व पुरातन हमामखाना म्हणजे स्नानगृह, रेवदंडा येथील सातखणी बुरुज, चौल-रामराज रस्त्यावर असलेले पुरातन नर्तनगृह किवा स्थानिक भाषेत नाचणारणीचा महाल ही रायगड जिल्ह्यातील काही उदाहरणे. अशी कोकणामध्ये असलेली कित्येक स्थळे जर भविष्यात विकसित करून त्यांचे मार्केटिंग केले तर पर्यटकांचा ओघ नक्कीच वाढू शकतो.

तिसरे महत्वाचे कारण म्हणजे येथील लोकांमध्ये असलेला शास्त्रशुद्ध आदरातिथ्य शिक्षणाचा अभाव. येथील लोक जरी परंपरेने आदरातिथ्यशील असले तरी पर्यटन आदरातिथ्य हे वेगळे शास्त्र आहे. ते शास्त्र शिकून घेणे फार आवश्यक आहे. त्याबरोबरच आधुनिकता व कल्पकतेचा वापर पर्यटनामध्ये होणे आवश्यक आहे. केरळ प्रमाणे येथे सुध्दा अत्याधुनिक आयुर्वेदिक केंद्रे (स्पा) व योग प्रशिक्षण केंद्रे उघडणे आवश्यक आहे.

पर्यटन अधिक फायदेशीर कसे होवू शकते?

म्हणून सध्या चालू असलेल्या कोकणातील पर्यटन व्यवसायाला शेती, मत्स्यशेती, दुग्ध व कोंबडी व्यवसायाची जोड दिली, पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिक स्पॉट निर्माण केले, ऐतिहासिक वारशांचे चांगले मार्केटिंग केले, वेलनेस सुविधा म्हणजे स्पांचे जाळे निर्माण केले, मुंबई पुण्याच्या कंपन्यांच्या सेमिनार व मिटींगसाठी चांगले हॉल तयार केले तर कोकणातील पर्यटन व्यवसायाला निच्छित उर्जितावस्था प्राप्त होईल.

कसे उभारता येईल शाश्वत पर्यटन मॉडेल?

कोकणात हजारो छोटी-मोठी  कॉटेजेस आहेत. परंतु हा पर्यटन व्यवसाय हा मोसमी आहे. त्यामुळे पूर्ण वर्षभर हा व्यवसाय चालू नसतो. त्यामुळे वर्षातील किमान सहा महिने हा व्यवसाय बंदच असतो. त्यामुळे सहा महिने उत्पन्न येत नाही. यावर मात करायची असेल तर पर्यटक नसले तरी या मॉडेल मधून काही प्रमाणात उत्पन्न येत राहिले पाहिजे. म्हणजे त्या शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होवू शकेल.

जर शेतकऱ्याकडे स्वतःची कमीतकमी १ एकर म्हणजे ४० गुंठे जमीन असेल तर एक आदर्श पर्यटन केंद्र उभे राहू शकते. या पर्यटन केंद्रात एक विहीर, एक गायींसाठी गोठा, एक छोटी पोल्ट्री, एक बकरी पालन गोठा, एक शेततळे, गोबर  गॅस सयंत्र, पर्यटकांसाठी कमी खर्चात बांधलेल्या खोल्या, स्वतःचे घर, नैसर्गिक भाजीपाला शेती, मोकळ्या जागेत  फळझाडांची लागवड  अशी व्यवस्था ४० गुंठ्यामध्ये उभी राहू शकतो. या केंद्राची रचना आपण अशी उभी करू शकतो की पावसाळ्यात जरी पर्यटन व्यवसाय नाही झाला तरी सुद्धा एक कुटुंब चांगले जीवन जगू शकते.

पर्यटन केंद्राचा मुख्य आधार – गावरान गाय

या पर्यटन केंद्राचा मुख्य आधार म्हणजे गावराण गाय. ही गाय गीर जातीसारखी जास्त दूध देणारी असावी. गाईचे दूध पर्यटकांसाठी तसेच स्वतःसाठी वापरता येईल. गाईच्या दुधापासून दही, ताक, लोणी, तूप काढता येईल.  गीर गाय कमीतकमी सरासरी ८ लिटर दूध रोज देते. सध्या गीर गायीच्या दुधाचा दर ८० रुपये लिटर आहे. म्हणजे ६४० रुपये रोज फक्त दुधाचेच उत्पन्न मिळू शकते. या गाईच्या तुपाचा दर २००० रुपयांपेक्षा जास्त आहे. जर्सीचे दूध हे पिण्यायोग्य नसल्याचे सिद्ध झाल्याने सध्या देशी गाईच्या दुधाला चांगली मागणी आहे. ही गाय दरवर्षी एक वासरू देते. तसेच गाईच्या शेणापासून गोबर गॅसची निर्मिती करून स्वयपाकाच्या इंधनाची गरज भागविता येईल. नैसर्गिक शेतीसाठी गायीचे शेण व गोमुत्राचा वापर करता येईल. गायीच्या गोवऱ्या व गोमुत्र विकू शकतो.

भाजीपाला लागवड

पर्यटकांसाठी लागणाऱ्या भाजीची गरज १० गुंठे क्षेत्रात रोटेशन पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास पूर्ण होऊ शकेल. ही भाजीपाला शेती पूर्णपणे कृषीऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक पद्धतीने केल्यास संपूर्णपणे विषमुक्त भाजीपाला हे पर्यटकांचे आकर्षण होऊ शकेल. पर्यटकांची गरज पूर्ण करून उरलेला भाजीपाला हा विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकेल. याच क्षेत्राचा उपयोग गाईसाठी हिरव्या चाऱ्यासाठी करता येईल.

फळझाडे  लागवड

पर्यटन केंद्रातील मोकळ्या जागेत फळझाडांची लागवड सुयोग्यरित्या करता येवू शकते. नारळ, आंबा, चिकू, पेरू तसेच कोकमासारखी (कमीत कमी एक) कित्तेक झाडे पर्यटन केंद्रात लावू शकतो. त्यांचे अधिक उत्पन्न मिळून पर्यटन केंद्र निसर्गरम्य करता येईल.

मस्त्य तळे

पर्यटकांसाठी लागणाऱ्या मासळीची गरज ही काही क्षेत्रात मस्यपालन केल्यास पूर्ण होऊ शकेल व उरलेल्या माश्यांची विक्री करता येऊ शकेल.

छोटी पोल्ट्री

गावठी तसेच इतर कोंबड्यांच्या पैदासीसाठी एक छोटी पोल्ट्री केल्यास चिकन व अंडी या केंद्रातच उपलब्ध होवून पर्यटकांकरिता खाण्यास वापरता येतील. उर्वारित कोंबडी व अंडी विकून चांगले उत्पन्न मिळू शकेल.

बकरीपालन

एक छोटी शेड तयार करून काही बकऱ्या व बोकडांचे  पालन या पर्यटन केंद्रात होवू शकते. त्यामुळे जास्तीचे उत्पन्न मिळू शकेल.

अशाप्रकारे शेती, मत्स्यशेती, दुग्धोत्पादन, कोंबडीपालन व बकरीपालन करून त्यास पर्यटनाची जोड दिल्यास एक आदर्श मॉडेल उभे राहून कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह होऊ शकतो. या केंद्रात एक साधा पण छोटा ओपन हॉल केल्यास वाढदिवसासारखे कार्यक्रम सुद्धा करता येतील व पर्यटकांसाठी बसायची व्यवस्था होवू शकेल. शेतकऱ्याकडे बैलगाडी असल्यास पर्यटकांना त्यातून रपेट मारून आणता येईल. 

तंबू निवास- एक किफायतशीर व्यवसाय

सध्या पर्यटक खोल्यात राहण्यापेक्षा तंबूत राहण्यास प्राधान्य देत आहेत. आपल्या पर्यटन केंद्रात आपण तंबू निवासाची सुद्धा सोय करू शकतो. एका दोन माणसे राहणाऱ्या तंबूची किमत सुमारे ३ हजार असते. पर्यटक एका दिवसाचे प्रत्येकी १२०० रुपयांपासून ते ३००० रुपयापर्यंत पॅकेज देण्यास तयार असतात. या पॅकेज मध्ये राहणे, चहा-नाश्ता व जेवण द्यायचे असते. त्यामुळे  कमी खर्चात जास्त पैसे आपण कमवू शकतो.

या मॉडेलमध्ये स्वतः शेतकऱ्याने काम करणे अपेक्षित आहे व जरूर पडल्यास कामगार मागविणे आहे.  पर्यटक फक्त समुद्राकिनारीच येतात असे नाही. ते डोंगर कपारीत, आंब्यांच्या किवा नारळी-फोफळीच्या बागेत किवा खारेपाटातसुद्धा येऊ शकतात. फक्त त्याचे ऑनलाईन मार्केटिंग करायला हवे.

या केंद्रासाठी शासकीय योजनेतून अडीच एकर क्षेत्र (शेजारील शेतकऱ्यांचे मिळून असले तरी चालेल) असेल तर विहिरीसाठी तीन लाख रुपये, शेततळ्यासाठी येणारा काही खर्च, बकरी पालन व पोल्ट्रीची शेड, गोबर गॅसचा खर्च,एका शौचालयाचा खर्च,  गाय विकत घ्यायची असल्यास काही रक्कम व शेतीसाठी सरकारकडून अनुदान मिळू शकते. कृषी पर्यटनासाठी अनेक योजना सुद्धा आहेत. अर्थात त्यासाठी कष्ट करायची तयारी हवी.

या वरील गोष्टींव्यतिरिक्त आणखी कितीतरी सृजनशील गोष्टी करता येतील व सध्या कोकणात बरेच व्यावसाईक नवीन नवीन प्रयोग करीत आहेत. या सर्व पर्यटक व्यावसायिकांची एक संस्था काढून माहितीचे आदानप्रदान व्हायला हवे.

कोकणातील तरुणांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी नोकरीच्या मागे न लागता असे पर्यटन केंद्र उभारून आपल्याच गावात, निसर्गात राहून एक चांगले नैसर्गिक जीवन जगण्यास काहीच हरकत नाही. यामुळे चांगले उत्पन्न मिळेलच व गावात रोजगार सुद्धा उपलब्ध करून देता येतील.